संध्याकाळचे ६:३० वाजले होते. तो एक हौशी फोटोग्राफर, फोटोग्राफीमध्ये आपल कारकीर्द घडली नाही याचा खेद त्याला आयुष्यभर राहील. पण काही क्षण का असेना आपण आवड तरी जपुया म्हणून तो फोटो काढायचा. फेरी गेटवे ऑफ इंडिया जवळून निघाली होती. फेरी मध्ये जाताच तो वर डेकवर गेला आणि रेलिंग जवळ जाऊन उभा राहिला. फेरी ने किनाऱ्याचा निरोप घेतला. सूर्यास्त होत आला होता. निसर्गाने क्षितिजावर आपल्या जादूची छडी फिरवली होती. कित्येक रंग आकाशात पसरले होते. सूर्यचा जणू दिवसा अखेरीस समुद्राला भेटण्याचा आनंद चौफेर आकाशात पसरला होता आणि तेवढाच आनंद समुद्राला सुद्धा झाला होता त्यामुळेच ते प्रतिबिंब समुद्रावर दिसत होत. त्याने हे सगळ कैद करायचं ठरवलं आणि त्या रम्य दृश्याचा एक फोटो काढला आणि मग कॅमेरा स्क्रीनवर पाहिलं तर पूर्ण फोटो हा सफेद आला होता, काहीच दिसेना. तेवढ्यात त्याच्या कानी एक प्रश्न ऐकू आला.
ती :- "मी एकदा प्रयत्न करू का?"
पाहिलं तर शेजारी एक मुलगी. डोक्याला रंगीबेरंगी स्काफ गुंडाळला होता. गळ्यात 4-5 लॉकेट आणि मनगटा भोवती खूप अशे मण्यांचे धागे दोरे बांधलेले होते. एक थोड ढगळ टीशर्ट आणि त्यावर आकाशी रंगाचा डेनिमच जॅकेट, हार्मन पँट. पाठीवर ट्रेकिंगची बॅग आणि त्या बॅगला देखील धागे दोरे गुंडाळले होते. त्याने तिच्याकडे पाहिलं आणि एकच शब्द त्याच्या मनात आला - लमाण(Hippy)
कॅमेरा म्हणजे त्याचा जीव की प्राण. अस कस सहज कोणाच्या हाती आपला जीव सोपवून द्यायचा. त्याला वाटणारी भीती ही स्पष्ट दिसत होती आणि त्याच कारण देखील तीला अगदी अचूक कळल.
ती :- "काळजी करू नको. मी स्वतःह फोटोग्राफर आहे त्यामुळे कॅमेरा कसा सांभाळायचा हे देखील माहित आहे." त्याने कॅमेरा तीच्या स्वाधीन केला.
तीने ही त्याची भीती कमी करावी म्हणून तो कॅमेरा आधी गळ्यात घातला.
तीने कॅमेराची सेटिंग पहिली आणि ती बदलून मग ५-६ फोटो तीने लागोपाठ काढले. अगदी फोटो काढते वेळीदेखील ती सेटिंग न बघता बदलत होती. मग तीने तो कॅमेरा त्याला दिला. फोटो पाहताच तो दंग राहीला. इतके सुंदर फोटो काढले होते. त्याला फक्त सूर्यास्त दिसत होता पण तिने सूर्यस्ता सोबत काहीशा दुरावर असलेलं, हळूहळू धुक्यात जाणार शहर, समुद्रावर पडणार सोनेरी-लाल रंगाची किरणे आणि एका फोटोमध्ये तर मावळणारा सूर्य, शांत समुद्र आणि त्यावर निवांत उडणारे पक्षी. असे फोटो पाहून होणारा आनंद त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. त्याने परिचय करून घेण्यासाठी हात पुढं केला आणि तो काही बोलणार तेवढ्यातच ती म्हणाली.
ती - "उगाच कोणते ही परिचय नको. मला फक्त तू काढलेला फोटो बघून अस वाटल की तुला मदत करावी. काही चांगले फोटो काढून द्यावे."
तो - "पण अस का?"
ती - "मोजक्या क्षणांची भेट त्यात तू मला मोजके ठरलेले प्रश्न विचारणार आणि मी ही तुला तेच प्रश्न विचारणार. मग काही सुर जुळतील नंतर सोशल मीडियावर शोध मोहीम. मोहीम फत्ते झाली की काही दिवस बोलून ओळखीचे अनोळखी होणार. त्यामुळे अशी नाती आणि माणसांची गर्दी न केलेलीच बरी."
तीच बोलण त्याला पटल होत पण मग अशी चांगली फोटोग्राफर आणि त्यामध्ये तीच्याकडून काही तरी शिकण्यासारखं आपल्याला मिळेलच. या हेतू ने त्याने तीला विचारलं.
तो - "बर ओळख नाही संवाद तर होऊच शकतो?"
नकार देण्यासारखं काहीच नव्हत. म्हणून तीनेच सुरुवात केली.
ती - "तू फोटोग्राफर तर नाहीच पण मग हा कॅमेरा? आता शिकतोय का?"
तो - "फोटोग्राफर होण्याची इच्छा खूप होती आणि आहे पण जबाबदारी सुद्धा त्यापेक्षा महत्वाची आहे. कॉर्पोरेटच्या दुनियेत मी हरवलो पण आता वेळ मिळेल तेव्हा थोड थोड हे स्वप्न ही जगतो."
ती - "स्वप्न किंवा जबाबदारी या मध्ये तू जबाबदारीला निवडल याच दुःख किंवा पश्चात्ताप होत नाही?"
तो - "रोज आणि प्रत्येक क्षणी होतो, होत आहे आणि राहील. पण जेव्हा आई बाबांना समाधानी आणि आनंदी पाहतो तर त्या पुढे सगळ काही शून्यच. आता सुध्दा जे मी आयुष्य जगतो ते काही वाईट नाही कारण मी परिस्थितीशी जुळवून घ्यायला शिकलो. असो, तू फोटोग्राफर आहेस?"
ती - "हो जसं तू जबाबदारी निवडलिस तसच मी स्वप्नांना निवडलं. मला फोटोग्राफीची आवड आहे आणि त्याबद्दल शिक्षण देखील घेतल. ५ वर्ष झाली प्रयत्न चालू आहेत पण यश म्हणजे काय हे अजून कळल नाही."
तो - "तू स्वप्नांना निवडून काही चूक केली अस तुला वाटत का?"
ती - "म्हंटल तर हो आणि म्हंटल तर नाही. गेल्या ५ वर्षांत अगदी काहीच साध्य झालं नाही अशातला भाग नाही. पण स्वार्थी होऊन, जबाबदारीकडे पाठ फिरवून फक्त स्वप्नांच्या मागे धावले. तेव्हा माझं खूप काही मागे सुटल. आई-बाबा, भाऊ-बहिण आणि मित्र-मैत्रिणी सुध्दा दिसले नाहीत. माझी फोटोग्राफीची आवड कधी त्याच वेड आणि नशेत रूपांतर झालं कळलच नाही. त्यामुळेच आज जे साध्य केलं त्याचा आनंद साजरा करण्यासाठी माझं अस शेजारी कोणीच नाही."
तो - "तुला न साध्य झालेल्या "यशांची व्याख्या" आता मला कळली."
तीच्या चेहऱ्यावर उसण हसू आल. एका अनोळखी सोबत एवढं काही बोलून बसावं याच नवल त्याला वाटत होत. या आधी कधीच कोणा अनोळखी सोबत असा संवाद झाला नव्हता. मोजके शब्द आणि संवाद ही मोठा नव्हता पण त्याच्या मनातलं खूप मोठं ओझ कमी झालं होत. त्याला आता हे जाणून घेण्याची उत्सुकता होती की तीचा हा फोटोग्राफीचा प्रवास कसा झाला? कोणते चढ उतार तीच्या आयुष्यात आले? कारण ती अस आयुष्य जगत आहे ज्याचं त्याने फक्त स्वप्न पाहिल होत. पण ती आता खूप शांत होती काही प्रश्न नाही आणि काही स्पष्टीकरण नाही. ते हसू जणू काही निरोपच होता. त्या क्षणात ती स्वतःसोबत होती. तो काही बोलणार तेवढ्यात फेरीचा भोंगा वाजला. ते अलिबागला पोहचले होते ती सुद्धा निघाली. निरोप घेण्यासाठी तीने हाथ पुढे केला. आता वेळ आली होती करारा प्रमाणे निरोप घेण्याची. दोघांनी हाथ मिळवून एकच सुरात निरोप घेतला.
ती - "तू जबाबदारी निवडून काहीच चुकीचं केलं नाहीस."
तो - "तू स्वप्न निवडून काहीच चुकीचं केलं नाहीस."
0 Comments