तो, ती आणि सोमवार सकाळ

सोमवार सकाळ...

                        कसातरी अंथरुणातून तो उठला आणि ऑफिसला जाण्याची तयारी करू लागला. ऑफिसला जाण्यासाठी उशीर झाला याची पावती रिकामा बस स्टॉप पाहून मिळाली आणि ते पाहून सिनियरच रौद्ररूप डोळ्यासमोर आल. या सगळ्या विचारात तो वैतागला होता. बसची वाट बघत तो हा सगळा विचार करत होता. दुष्काळात तेरावा महिना म्हणजे पाऊसही सुरू झाला. छत्री उघडे पर्यंत तो भिजला होता. पुन्हा वाट पाहण्यासाठी त्याची रस्त्याकडे नजर वळली.  तेवढ्यात डोळ्यासमोर एक छत्री आली. त्याने छत्रीत कोण आहे हे पाहण्याचा प्रयत्न केला पण छत्रीमुळे त्याला स्पष्ट चेहरा दिसत नव्हता. आपण काही मागावं आणि देवाने पटकन तथास्तु म्हणाव असच काहीस झालं. वाऱ्याने छत्री थोडी हलू लागली आणि त्याला ती दिसली. क्षण, श्वास आणि हृदयाचा ठोका हे जणू एकच वेळी स्तब्ध झाले.

                        ती कोण? तीच नाव काय? काहीच माहीत नाही. पण तरी ही ती अनोळखी वाटली नाही. त्या काही क्षणात तिच्याशी एकवेगळाच बंध जाणवला. तिचा चेहरा दिसत नव्हता. दिसत होती ती फक्त नक्षीदार, कोवळी आणि शुभ्र मान, रेशमी आणि वाऱ्यासह खेळणारे लांब सडक केस आणि त्या केसांच्या आडून डोकावून पाहणारा तिचा कानातला झुमका. तो तिला पाहण्यात गुंग झाला होता. तेवढ्यात बसचा हॉर्न वाजला आणि ती बस मध्ये चढण्यासाठी धावली. आता आपल्याला तिचा चेहरा बघायला मिळू शकतो या आशेवर तो धडपड करू लागला. ती बस मध्ये चढली हळू हळू पुढे जाऊ लागली तो देखील रस्त्यावर तसाच पुढे चालत चेहरा पाहण्यासाठी धडपड करू लागला. पण तेवढ्यात बस सुरू झाली आणि चेहरा काही नजरेस पडला नाही. तो आता आनंदी आणि निराश या दोन्ही भावनांना एकाच वेळी जगत होता.

                        तो आनंदी होता कारण त्या काही क्षणात त्याला एक वेगळीच ओढ जाणवली, त्याला संपूर्ण असल्याची जाणीव झाली आणि निराश यामुळे की ओळख तर झाली नाहीच पण तिचा चेहरा ही बघता आला नाही. नाव विचारण्याच धाडस झालं नाही कारण उगाच चारचौघात वाभाडे काढेल याची भीती वाटत होती. आता तो आवडत्या गाण्यासारखा ते क्षण पुन्हा पुन्हा आठवण करून जगत होता. पुन्हा तो बसची वाट पाहू लागला आणि सहजच त्याने शेजारी असलेल्या व्यक्तीला विचारलं 521 बस गेली का हो? तो व्यक्ती कपाळावर आठ्या आणून आणि गोंधळून बोला "आता तर तुझ्या पुढ्यातून गेली".

Post a Comment

0 Comments

Facebook Twitter Instagram