आपण रोजच्या प्रवासात खूप काही बघतो. अशा गोष्टी असतात ज्या गोष्टी दिवसभर आपल्या लक्षात राहतात. काही संवेदनशील काही मजेशीर. आज सकाळी घरातून निघालो. मोजून ५ मिनिटांसाठी नजरेसमोर घडलेला क्षण सांगतो. बाहेर पडताच रस्त्याच्याकडेला टॅक्सी उभी होती. टॅक्सीमधून एक फॅमिली खाली उतरली. नवरा पुढे ड्रायवरच्या शेजारी बसला होत. मागे त्याची बायको आणि २ मूल होती. मागच्या सीटवरुन तिघेही खाली उतरले. मी टॅक्सीपासून थोड्याच अंतरावर होतो. तो व्यक्ति खाली उतरला. टॅक्सी ड्रायवर खूप वैतागला होता. नीट लक्ष दिल्यावर कळलं की त्या व्यक्तीकडे पुरेसे पैसे नव्हते तर तो होते तेवढे पैसे टॅक्सी ड्रायवरला देत होता आणि उरलेले पैसे सोडून दे अस म्हणत होत. पण टॅक्सी ड्रायवर ची सकाळची पहिली कमाई सोडायला तयार नव्हता.

marathi blog

तो व्यक्ति वैतागला. हातात होते तेवढे पैसे त्याने टॅक्सी ड्रायवरच्या सीटवर फेकले आणि पुढे चालू लागला. टॅक्सी ड्रायवर रागात टॅक्सीच्या बाहेर निघाला आणि त्या व्यक्तीवर धावत गेला आणि त्या दोघांची चांगलीच हाणामारी चालू झाली. आजूबाजूला सगळी लोक एकच चर्चा करत होती. "पैसे नव्हते तर बसवच का?" तर काही माणसं बोलत होती "काही पैसे कमी दिले म्हणून काय झाल? माणुसकी आहे की नाही".

पण रस्त्याच्या कडेला २ पोर कमरेशी कवटाळून आणि त्यांचे चेहरे आपल्या कुशीत लपवून त्या व्यक्तीची बायको आणि पोर हुंदके देऊन रडतान कोणालाच दिसेना. जो तो आपले सल्ले देण्यात मग्न पण कोणी पुढे जाऊन भांडण सोडवत नव्हता. अर्थात मी देखील गेलो नाही. मी जेवढ नजरेस आणि नशिबात लिहिलेल बघून पुढे गेलो.

पण खरतर माझ्या डोक्यात त्यांच्या भांडणाचा किंवा जगाचा विचार नव्हता. माझ मन हेच विचार करत होत की त्या मुलांच्या मनावर काय या भांडणाचा काय परिणाम झाला असावा? म्हणजे त्यांनी अस वाटत डोळे मिटले असतील आणि "हे स्वप्न कधी एकदाच नाहीस होत आहे" अस त्यांना झाल असेल. लोकांच बोलण आणि त्या भांडणाचे आवाज त्यांच्या कानात गरम वितळत शिस ओतल्यासारख झाल असाव आणि त्यानेच त्यांच्या कोमल काळजवर ही आठवण कोरून ठेवली असेल.

ती मूल किती हतबल असतील की अशा परिस्थितीत काहीच करू शकत नव्हते. आपण देखील त्या मुलांसारखेच कधी कधी परिस्थितीसमोर हतबल असतो. काही भोग हे मुकाट्याने भोगावे लागतातच. त्यातून शिकवण घेऊन आपण पुढे चालत राहायच. किती ही वेदना झाली तरी सहन करून वेळ मारून घेऊन जायाची. असो नशिबी दुख सगळ्यांचे आहेत. ज्याला त्याला सहन करून पुढे जायच आहे. जस मी नेहमी म्हणतो आपण किती सुखात आहोत हे पाहायच असेल तर जगात किती दुख आहेत ते पाहा.